सातारा- धनादेश न वटल्याने बिग बॉसमधून पोलिसांनी अटक केलेल्या अभिजित बिचुकले याला शनिवारी तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली. यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दहा वर्षांपूर्वी त्याने पोस्टमनला मारहाण केली होती. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता.
२८ हजारांचा धनादेश न वटल्याने अभिजित बिचुकलेला काही दिवसांपूर्वी सातारा पोलिसांनी बिग बॉसमधून अटक केली होती. जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचवेळी पोलिसांनी पूर्वी दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात त्याला अटक केली. या गुन्ह्यामध्ये त्याला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडीत सुनावण्याचे आदेश देण्यात आले. बिचुकलेने जामीन अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन फेटाळला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे.