सातारा - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील सुरूर (ता. वाई) येथे उड्डाणपुलावरील पुणे-सातारा लेनवर कारने माल ट्रकला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोन जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
हेही वाचा -बारा हजारांची मागणी करणाऱ्या वाईच्या लाचखोर लिपिकास ४ वर्षे सक्तमजुरी व दंड
उभ्या ट्रकला धडक
उड्डाणपुलावरील पुणे-सातारा लेनवर एक माल ट्रक ( क्र. एमएच 12 पी.क्यू 6846) उजव्या बाजूचा पुढील टायर फुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूस उभा होता. या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या झायलो कारने ( क्र. एमएच 04 जी.डी 1205) जोरादार धडक दिली. या अपघातात कार चालक अजय राजेंद्र सुतार (वय 26) व केदार दत्तात्रय वेल्लाळ (वय 25, दोघेही रा. मसूर ता. कराड) हे दोघेही जाग्यावरच ठार झाले. तर, कारमधील सुजित रामचंद्र आवटे ( वय 42) व अशोक कांबळे (वय 35, दोघेही रा. कराड) हे गंभीर जखमी झाले.
कार ट्रकमध्ये घुसली
कारची धडक एवढी जोरदार होती की, अर्ध्याहून अधिक कारची पुढील बाजू ट्रकच्या पाठीमागील बाजूस घुसली होती. त्यामुळे, कारचालक अजय सुतार व शेजारी बसलेले केदार वेल्लाळ हे जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच जोशी विहीर महामार्ग पोलीस केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक एस.के. पोवार व त्यांचे कर्मचारी, तसेच भुईंज पोलीस केंद्राचे कर्मचारी हजर झाले. अपघातामुळे महामार्गावरून साताराच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी गंभीर जखमींना सातारा येथील खासगी रुग्णालयामध्ये पाठवले, तर ठार झालेल्यांचे मृतदेह कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.
हेही वाचा -'सरपंच झालं की मृत्यू होतो'! 'तिने' दिली अंधश्रद्धेला मूठमाती