सातारा : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) मोठा गाजावाजा करत महाराष्ट्रात एन्ट्री केल्यानंतर आगामी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये प्रवेश केलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील यांना सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. माळशिरसचे माजी आमदार दिवंगत शामराव पाटील यांच्या त्या कन्या आहेत.
सुरेखा पाटील यांना राजकीय वारसा :सुरेखा पाटील यांना राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील दिवंगत शामराव पाटील यांनी 1977 मध्ये माळशिरस विधानसभा निवडणुकीत 'नांगरधारी शेतकरी' चिन्हावर निवडणूक लढवून सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा ऐतिहासिक पराभव केला होता. सुरेखा पाटील या त्यांच्या कन्या आहेत. तसेच त्या सोलापूर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुनील पाटील यांच्या भगिनी आहेत. पाटण विधानसभा मतदार संघातील सुपने गाव हे त्यांचे सासर आहे. डॉ. महेंद्र पाटील यांच्या त्या पत्नी असून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या त्या सदस्य होत्या.
कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्र्यांचे भोजन :सुरेखा पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातील राजकीय कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत हैदराबाद येथे बीआरएस पक्षात प्रवेश केला. यावेळी सर्वांना विकासकामे दाखविण्यात आली. त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी दुपारी भोजन केले. त्यावेळी राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी महिलांकडून त्यांच्या मतदार संघातील राजकीय परिस्थिती, विकासाची माहिती घेतली. सुमारे चार तास वेळ देऊन केसीआर यांनी बीआरएसच्या राजकीय समीकरणांची मांडणी केली.