सातारा -बहीण-भावाचे नाते जपणाऱ्या रक्षाबंधनानिमित्त साताऱ्यातील नेहा देशमुख या तरुणीने खास राखी तयार केली आहे. तिने पेरणीयोग्य बियांच्या साह्याने पर्यावरणपूरक राख्या तयार केल्या आहेत. गेली तीन वर्षे नेही ही पर्यावरणपूरक राख्या तयार करते. दिवसेंदिवस या राख्यांना मागणी वाढत आहे. नवी पिढी पर्यावरण सजग बनत आहे, हे सुचिन्ह असल्याचे तिचे म्हणणे आहे.
बहिणीची भावाला अमूल्य भेट
साताऱ्यातील विसावा नाका परिसरात राहणारी नेहा देशमुख ही व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. 'ईटीव्ही भारत'ने नेहाशी बोलून तिची या राखी मागची संकल्पना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, ''आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना फार महत्त्व आहे. या सणातून आपण निसर्गाला काय देऊ शकतो, या विचारातून बियाणांची राखी ही संकल्पना सुचली. पर्यावरणपूरक एखादी गोष्ट लोकांना दिली तर ती स्वीकारायला थोडा वेळ जातो. पण, आपली संस्कृती आणि पर्यावरण एकत्र आणले तर लोक लवकरच ते स्वीकारतात. त्यातून पेरणीयोग्य बियांच्या राखीची संकल्पना मूर्त स्वरूपात आली. रक्षाबंधन झाल्यानंतर त्या बी पासून एक रोप निर्माण होणार आहे. नवनिर्मिती ही बहिणीने भावाला दिलेली अमूल्य भेट असेल अशी या मागची माझी धारणा आहे.''
हेही वाचा-भाजपाने कितीही जनआशीर्वाद यात्रा काढली, तरी जनतेची तळतळाट लागणारच - भाई जगताप
5 बिजांच्या राख्या
या राखी सोबत बिजाची माहिती आणि त्याचे आयुर्वेदातील महत्त्व विषद करणारे माहिती पत्र दिले जाते. ज्यातून लोकांची जिज्ञासा जागृत होईल असेही नेहाने स्पष्ट केले. 'प्रदूषण कमी झालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. त्यात माझे योगदान म्हणून मी या पर्यावरणपूरक राखी या उपक्रमात नेहा सोबत सहभागी झाल्याचे आकाश कदम याने स्पष्ट केले. नेहाला ही राखी बनवण्यासाठी तिचे आई-वडील, धाकटा भाऊ निनाद तसेच मित्र-मैत्रिणींची मदत होते. मधुमालती, पुत्रंजिवी, काकडी, घोसावळं आणि दोडका अशा पाच बियांच्या प्रकारापासून राख्या बनविल्या असल्याचे अनिकेत साळुंखे याने सांगितले.