सातारा- कोरोनातून निर्माण झालेल्या औद्योगिक संधीचा फायदा साताऱ्यात दोन-चार मोठे उद्योग आणा, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीचे पत्र त्यांनी ई-मेलद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही पाठविले आहे.
आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रात म्हटले, की कोरोनामुळे चीनमधून अनेक मोठे उद्योगधंदे बाहेर पडणार आहेत. त्यातील अनेक भारतात आणि महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. साताऱ्यातही काही मोठ्या कंपन्या आल्या तर सातारा शहर आणि तालुक्याचा विकास गतिमान होईल.
हेही वाचा-चालू वर्षात देशाच्या जीडीपीचा विकासदर उणे राहील- आरबीआय गव्हर्नर
सातारा शहरालगत देगाव, निगडी याठिकाणी नवीन एमआयडीसी मंजूर आहे. याठिकाणी डोंगराच्या पायथ्याची पडीक आणि माळरान जमीन मोठ्या उद्योगांसाठी उपलब्ध होईल. भूसंपादन करताना शेतजमीन न घेता नापीक अथवा पडीक जमीन घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. स्वेच्छेने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करून त्याठिकाणी किमान तीन-चार मोठ्या कंपन्या सुरू करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने प्राधान्य द्यावे, असे पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा-पुण्यातील कुरकुंभ एमआयडीसीत भीषण आग; तीन बंब घटनास्थळी दाखल
सातारा शहरापासून पुणे, मुंबई, बंगळूर या शहरांना जोडणारा महामार्ग आहे. मात्र सातार्यात एकही मोठा उद्योग, कंपनी नाही ही सातारकरांची अनेक वर्षांची खंत आहे. मोठे उद्योगधंदे नसण्याची सातारकरांची खंत कायमची दूर करावी. याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी निवेदनात केली आहे.
हेही वाचा-'कर्जाच्या मुदतवाढीचा लाभ सावधानतेनेच घ्या'