सातारा -शनिवारी पहाटे एका खासगी ट्रॅव्हल्सवर छापा टाकत बोरगाव पोलिसांनी सुमारे पावणेचार कोटी रुपये किमतीची चांदी पकडली. दागिने व भांड्यांच्या स्वरूपात असलेल्या या चांदीमुळे आज दिवसभर त्याचे मोजमाप करण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा याबाबतची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली.
साताऱ्याजवळ ४ कोटी रुपयांची चांदी जप्त पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशियाई महामार्गावर कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कार्तिक ट्रॅव्हल्स (एम.एच.०९ सी.व्ही.११७२) मधून अवैधरित्या चांदीची वाहतूक होत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाली. त्या आधारे नाकाबंदी चालू असताना रात्री दीड वाजण्याच्या सुमारास नागठाणे चौकात, कराड-सातारा लेनवर पोलिसांनी संशयित खासगी आरामबस थांबवून झडती घेतली. बसच्या डिक्कीची तपासणी करत असताना एक काळ्या रंगाची बॅग व चांदीच्या विविध प्रकारच्या दागिन्यांनी खचाखच भरलेली २० ते २५ गोणी, लाकडी पेट्या आढळून आल्या.
सुमारे ३ कोटी ६४ लाख ताब्यात
पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ट्रॅव्हल्स चालकाने सोनसिंग परमार, अमोल भोसले, मनोजकुमार परमार (तिघेही रा. कोल्हापूर) या व्यक्तींची नावे सांगितले. या तिघांना बोलवून केलेल्या चौकशीत हे दागिणे त्यांचेच असल्याचे कबुल केले. या दागिण्यांच्या पावत्यांबद्दल त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे मुद्देमाल चोरीचा असल्याच्या संशयाने ताब्यात घेण्यात आला आहे. एकूण ५९१ किलो २८० ग्रॅम चांदीचे दागिने, १९ तोळ्याचे सोन्याचे दागिने असा सुमारे ३ कोटी ६४ लाख १४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मुल्यांकनाचे काम
दिवसभर सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली ताब्यात घेतलेल्या चांदीचे मूल्यांकन व मोजमाप करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.सागर वाघ, हवालदार मनोहर सुर्वे, सुनिल जाधव, किरण निकम, विजय साळुंखे, विशाल जाधव, प्रकाश वाघ, राहुल भोये, उत्तम गायकवाड, चालक पवार यांनी केली आहे.