सातारा- जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कवाडेवाडी येथे 13 गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली. सातारा पोलीस दलातील बॉम्ब शोधक पथक व श्वान पथकाने हे सर्व बॉम्ब निकामी केले. रानडुक्करांच्या शिकारीसाठी या बॉम्बचा वापर करण्यात येणार होता, असे पोलिसांनी सांगितले.
साताऱ्यात सापडले 13 गावठी बॉम्ब हेही वाचा - राज्यपालांनी राज्याची सूत्रे हाती घ्यावीत- पृथ्वीराज चव्हाण
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी कवाडेवाडी (हिवरे )येथे बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा तत्काळ बॉम्ब शोधक पथकासह श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत डोंगरावर पोलिसांची शोध मोहिम सुरु झाली. सकाळी सुरु झालेले हे सर्च ऑपरेशन दुपारपर्यंत सुरु होते. यावेळी एका संशयिताकडून 9 बॉम्ब हस्तगत करण्यात आले. तर सुर्या या पोलिसंच्या श्वानाने 4 बॉम्ब जमिनितून शोधून काढले. रानडुक्करांच्या शिकारीसाठी हे बॉम्ब आणल्याची कबुली संशयिताने दिली.
हेही वाचा -जय पराजयापेक्षा जनहित महत्वाचे - सत्यजीतसिंह पाटणकर
मनीबबे सुरपचंद रजपुत (वय 45 रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. कवाडेवाडी ता. कोरेगाव) यास अटक करण्यात आली आहे. कवाडेवाडी गावच्या हद्दीत बॉम्ब असल्याची माहिती पसरल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. बघ्यांची गर्दीही उसळली होती. सुमारे 4 तासांहून अधिक काळ बॉम्ब शोधण्याची मोहिम राबवल्यानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.