सातारा - जिल्ह्यातील कराडच्या वांग नदीच्या पाण्यात वाहून गेलेल्या क्षितीजा साठे (12) या मुलीचा मृतदेह तब्बल चौथ्या दिवशी (रविवारी) सकाळी साडेसातच्या सुमारास वांग नदीच्या पात्रात मच्छिमारांना आढळून आला. नदीपात्र ओलांडताना आजोबांसह ३ नाती पाण्यात वाहून गेल्या होत्या, त्यातील तिघांना नागरिकांनी वाचविले होते. मात्र, क्षितीजा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेली होती. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. अखेर रविवारी तिचा मृतदेह सापडला.
हेही वाचा -नदीपात्र ओलांडताना आजोबांसह तीन नाती गेल्या वाहून; एक मुलगी बेपत्ता
क्षितीजाचा मृतदेह सापडल्याचे कळताच सणबूर (ता. पाटण) या तिच्या गावातील नागरीक आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. वांग-मराठवाडी धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नदीकाठच्या गावांना पूर्व सूचना देण्यात आली नव्हती. तसेच नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळेच क्षितीजाचा हिचा नाहक बळी गेला आहे. धरण व्यवस्थापनाने या घटनेची जबाबदारी लेखी स्वरूपात स्वीकारावी. तसेच या घटनेस जबाबदार असणार्या दोषींवर कारवाई करावी. तरच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ, अशी भूमिका क्षितीजाच्या नातेवाईकांनी आणि सणबूरच्या ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. नंतर लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन हिरे यांनी घटनास्थळी येऊन संपूर्ण प्रकाराची ८ दिवसात चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच पाटणचे डीवायएसपी अशोकराव थोरात यांनीही पोलीस खात्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची ग्वाही दिल्यानंतर तणाव निवळला. त्यानंतर सणबूर ग्रामस्थांनी क्षितीजाचा मृतदेह ताब्यात घेतला. दुपारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.