सातारा:सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल खात्यातील लाचखोर मंडल अधिकारी, तलाठ्यासह खासगी इसमावर कारवाई केली आहे. याप्रकरणी मंडलाधिकारी विनायक पाटील, खासगी इसम मंगेश गायकवाड आणि तलाठी जय रामदास बर्गे यांच्यावर कराड शहर आणि वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या दस्ताच्या नोंदीवर हरकत आल्याने त्याची सुनावणी घेऊन तशी नोंद धरून सातबारा उतारा देण्यासाठी १५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजेडीअंती १० हजार रूपये देण्याचे ठरले होते. लाचेची रक्कम स्विकारताना मंडलाधिकारी कार्यालयातील खासगी व्यक्ती मंगेश गायकवाड यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी रंगेहात पकडले आहे.
डिस्कळचा तलाठी रंगेहात सापडला: तक्रारदाराच्या जमिनीची खातेफोड नोंद धरून सातबारा देण्यासाठी तलाठी जय रामदास बर्गे याने २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी दहा हजार रूपये पूर्वी घेतलेले होते. उर्वरित १० हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपये अजय बाळकृष्ण शिपटे यांच्या झेरॉक्स दुकानामध्ये ठेवायला सांगितले. तक्रारदाराने काऊंटरवर ठेवलेली लाचेची रक्कम घेताना एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. तसेच खासगी इसमाने लाच स्वीकारली त्यावेळी मंडल अधिकारी विनायक पाटील घटनास्थळी उपस्थित नव्हता. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत होते. रात्री नऊच्या दरम्यान तो स्वतः एसीबी पकाकाला शरण आला. त्याला ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात आली.