सातारा - माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील गुरूवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी देखील जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.
डॉ. अतुल भोसले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून पुरोगामी विचारांची पाठराखण केली आहे. तेव्हापासून मतदारसंघातील जनतेने काँग्रेसच्या उमेदवारालाच साथ दिली आहे. देशात व राज्यात धर्मद्वेष, जातीय विचारांना आसरा दिला जात आहे. यामुळे समाज व विशेषतः तरुण पिढीच्या भवितव्याचे नुकसान सुरु आहे. आम्ही ही निवडणूक जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर लढणार आहोत. विरोधकांनी भावनिक मुद्यांपेक्षा विकासावर बोलावे. गेल्या पाच वर्षात देशाची आणि महाराष्ट्राची प्रचंड अधोगती झाली आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. सर्वच पातळ्यावर केंद्र आणि राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे, असे पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषदेत म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण अर्ज दाखल करताना हेही वाचा - पाटण विधानसभेसाठी सत्यजितसिंह पाटणकर आणि शंभूराजे भरणार अर्ज
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नवीन प्रशासकीय कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अविनाश मोहिते, प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे, कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, कराडचे नगरसेवक इंद्रजीत गुजर, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, इंद्रजीत चव्हाण, कराड शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र माने हे उपस्थित होते.
हेही वाचा - प्रदुषणमुक्तीचा संदेश देत कोल्हापुरात ऋतुराज पाटीलांनी सायकलवरून भरला उमेदवारी अर्ज
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी डॉ. भोसले यांच्या सोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, विनायक भोसले, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, कृष्णा उद्योग समुहातील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.