सातारा - स्वार्थासाठी सातारा जावळीचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले हे भाजपात आले आहेत. आता भाजपमधील कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात बोलण्यास सुरवात केली आहे. आयात उमेदवार नको, शिवेंद्रराजे हटाव सातारा भाजप बचाव अशा घोषणा दिल्या जात आहेत.
इतकी वर्षे इमान इतबारे पक्षाची सेवा करायची आणि आयता मेवा खायला हे येणार का ? असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे. भाडोत्री उमेदवारी नही चलेगी म्हणत सातारा भाजपमधील खदखद बाहेर पडली आहे. राष्ट्रवादीमधून सत्ता उपभोगून पुन्हा सत्तेसाठी इकडे येत असतील तर आम्ही आजवर जे काम केलं त्याची ही किंमत असेल तर ते चालणार नाही. असं म्हणत शिवेंद्रराजे यांच्या उमेदवारीला विरोध करत दीपक साहेबराव पवार यांच्या नावे उमेदवारीचा ठराव पास करण्यात आला आहे.