सातारा - केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भाजपने खासदार उदयनराजे भोसले यांना डावलल्याने साताऱ्यात उदयनराजे समर्थकांचा अपेक्षाभंग झाला आहे. 'मुळात यावेळी उदयनराजे फारसे इच्छुक नव्हते. त्यामुळे त्यांचे नावही चर्चेत नव्हते' असे काही जवळच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तर 'भाजप त्यांच्या रीतीप्रमाणे उदयनराजे यांचा राजकीय वापर करत असल्याचे मत राजकीय निरीक्षकांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना नोंदवले.
समर्थकांत डावलल्याची भावना
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी विस्तार झाला. मंत्रिमंडळात 43 नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून नारायण राणे, भागवत कराड, डॉ. भारती पाटील व कपिल पाटील त्यांनी पदभार स्वीकारला. भाजपने हा विस्तार करताना मराठा, आगरी, आदिवासी या समाजाला प्रतिनिधित्व देत राजकीय समतोल सांभाळला आहे. मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवत असताना कोकणात शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठीच राणे यांना भाजपने ताकद दिल्याचे सांगितले जाते. मात्र, हे करताना राज्यसभा सदस्य, साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांना बाजूला ठेवण्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये पाहायला मिळते.
राष्ट्रवादी-भाजपने उठवला लाभ
'भाजपने उदयनराजे यांना डावलून मोठी चूक केली. त्याची किंमत पक्षाला उद्याच्या काळात मोजावी लागेल,' अशी प्रतिक्रिया सातारा हाॅकर्स संघटनेचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केली. "उदयनराजेंच्या सरळ स्वभावाचा आजपर्यंत राष्ट्रवादी व भाजपने राजकीय लाभ उठवला. प्रत्येक वेळी असेच होत आले. यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी आम्हा कार्यकर्त्यांना मोठी अपेक्षा होती," असेही ते म्हणाले.