सातारा- खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील शीतुयद्ध सर्वश्रुत आहे. सध्या दोघेही भाजपमधून प्रतिनिधित्व करत असले तरी स्थानिक राजकारणात मात्र वारंवार एकमेकांना शह-काटशह देताना दिसून येतात. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतयुद्धाचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना पाहायला मिळाला आहे. ‘महाराष्ट्रात सातारा विकास आघाडी एकमेव अशी आघाडी असेल जी केलेली कामे लोकांपुढे जाहीरपणे मांडते. कारण, आम्ही केवळ शब्द देत नाही, तर तो पाळतो देखील, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिका निवडणुकांच्या तोंडावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता लगावला आहे.
उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना अप्रत्यक्ष टोला
खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मंगळवारी शहरात पाच ठिकाणी पथदिव्यांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी राजकीय टोलेबाजी करत शिवेंद्र राजेंवरही निशाणा साधला. यावेळी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक दत्ता बनकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
वाढीव हद्दीतील रस्त्यांना प्राधान्य -
उदयनराजे म्हणाले, ‘हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या शाहूनगर, विलासपूर, करंजे तसेच खेड ग्रामपंचायत या क्षेत्रातील काही भागांना तब्बल चार दशके विजेची सोय नव्हती. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पालिकेने जनरल फंडातून पन्नास लाख रुपये खर्च टाकून पथदिव्यांचे काम पूर्ण केले. या भागात वीज तसेच रस्ते, पाणी अशा मुलूभत सेवा-सुविधा उपलब्ध करणे हे पालिकेचे व सातारा विकास आघाडीचे कर्तव्य आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील.
कण्हेर योजनेचे उद्घाटन लवकरच-
वाढीव भागातील तरुणांसाठी खेळाचे मैदान उभारण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शाहूपुरी भागाला वरदान ठरणा-या कण्हेर पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन पुढील आठवड्यात केले जाईल, असेही ते म्हणाले. हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागात वीज, पाणी आणि रस्ते अशा मुलभूत सेवांची पूर्तता करणे हे आघाडीचे कर्तव्य आहे. येत्या काही दिवसांत ही कामे प्रत्यक्ष सुरू केली जातील,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
हेही वाचा - सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक बिनविरोध व्हावी - उदयनराजे भोसले
हेही वाचा - उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे समर्थकांमध्ये राडा; नगरसेवकासह जमावावर दरोड्याचा गुन्हा