सातारा -भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर उठलेल्या वादावर भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या खास तिरकस शैलीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोणी कोणावर टीका केली. याचे मला काही देणेघेणे नाही. टीका करताना पडळकर यांनी मला विचारले नव्हते. त्यामुळे मी या विषयावर काहीही बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे. ते साताऱ्यामध्ये पत्रकारांनी बोलत होते.
उदयनराजे म्हणाले की, 'माझी मते मी परखडपणे मांडत असतो. इतरांनी काय मते व्यक्त केली, त्यावर मी काहीही बोलणार नाही. साताऱ्यांमधील वैद्यकीय महाविद्यालय मागेच सुरू व्हायला हवे होते. ते का रखडले मला माहित नाही. आता नवे सरकार हे महाविद्यालय सुरू करणार असेल तर चांगलेच आहे. कोण काम करतयं हे महत्वाचं नाही. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. केंद्रातून काही मदत लागणार असेल तर मी मिळवून देईन.'
उदयनराजे भोसले बोलताना...
कोरोनाचा एवढा बाऊ करायला नको. लोकांनी घाबरुन जाऊ न जाता वस्तूस्थितीला सामोरे जायला हवे. किती दिवस लाॅकडाऊन करणार? असे अनेक विषाणू आहेत. आपल्यातील अनेकांना कोरोना होऊनही गेला असेल. आपल्यातील प्रतिकार क्षमतेने त्यावर मात केलेली असू शकते. लॉकडाऊनमुळे लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. उद्या चोऱ्या माऱ्या वाढतील. लोकांना काम करायचे आहे. सुरक्षा उपाय करून लोकांना कामे करण्यास परवानगी द्यायला हवी, असेही उदयनराजे म्हणाले.
आषाढी वारीनिमित्त मी विठ्ठलाकडे साकडं घालण्यासाठी जाणार होतो. परंतु विठ्ठलाच्या पुजेसाठी प्रमुख दोन-तीन पुजारी आणि सरकारी पाहुणे अशांनाच परवानगी देण्यात आली असल्याचे मला सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मी जाऊ शकत नाही. सामाजिक प्रश्नात राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन मार्ग काढावा आणि महाराष्ट्राचा आदर्श इतर राज्यांनी घेण्यासारखं काम उभं रहावं, असेही उदयनराजे म्हणाले.
सातारा पालिकेतील लाचलुचपतच्या घटनेच्या अनुषंगाने ते म्हणाले, कोणा एकामुळे संपूर्ण पालिकेतील कर्मचा-यांवर ठपका ठेवता येणार नाही. असे केले तर पालिकेतील कर्मचारी काम कसे करणार? असा सवालही त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.
हेही वाचा -पिकांच्या राखणीसाठी ढेबेवाडी खोऱ्यातील शेतकऱ्यांचा झाडांवर बसून जागता पहारा
हेही वाचा -काटेकोर पद्धतीने शेती करणे ही काळाची गरज - विश्वजित कदम