सातारा- विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता विरोधी पक्षच शिल्लक ठेवणार नाही, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासारखा कार्यकर्ता महाराष्ट्राच्या विधानसभेत नक्कीच दिसेल, असेही ते म्हणाले. कराड तालुक्यातील उंब्रज येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.
हेही वाचा - शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला
भाजपमध्ये शिस्त महत्वाची मानली जाते. शिस्त पाळणार्या कार्यकर्त्याला ताकद देण्याचे काम भाजपने केले. मुंबईचे अध्यक्षपद, खासदार राहिलेले किरीट सोमय्या यांना तिकीट मिळाले नाही. परंतु, नाराज न होता आजही ते पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारात सक्रिय आहेत. ही पक्षातील शिस्त आहे. अशा कार्यकर्त्यांचा पक्ष नेहमीच सन्मान करतो. भाजप-शिवसेनेची युती आहे. कराड उत्तरमध्ये धैर्यशील कदम हे महायुतीचे उमेदवार आहेत. विरोधातील उमेदवार मनोज घोरपडेंनी बंडखोरी केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांनी धैर्यशील कदम यांना पाठिंबा जाहीर करावा. त्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असेही लाड यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे. महायुतीचा धर्म सर्वांनी पाळायचा आहे. महायुती आणि भाजपला सक्षम आणि भक्कम करण्यासाठी कराड उत्तरच्या जनतेने धैर्यशील कदम यांना निवडून द्या, असे लाड म्हणाले.