पंढरपूर (सोलापूर) -सातारा-पंढरपूर रस्त्यावरील पिलीव घाट परिसरात साताऱ्याहून सोलापूरला जाणाऱ्या एसटी बसवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली होती. त्या घटनेनंतर सोलापूर व सातारा जिल्हा पोलिसांनी कोंम्बिग ऑपरेशन सुरू केला आहे. तपासावेळी घटनास्थळाजवळ एक दुचाकी सापडल्याची माहिती, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके यांनी दिली आहे.
काय आहे प्रकार..?
सातारा-पंढरपूर रस्त्यावर पिलीव घाटात मंगळवारी (दि. 19 जाने.) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये 4 ते 5 वाहनांच्या काचा फुटल्या असून वाहनांचे नुकसान झाले होते. तसेच या दगडफेकीत बस जवळून जाणाऱ्या एका दुचाकीस्वार जखमी झाला आहे.