सातारा- माण तालुक्याच्या उत्तर भागातील ३२ गावांना गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेमार्फत पाणी देण्याचे ठरले आहे. या योजनांच्या कामांचे आज भूमिपूजन होणार आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते दुपारी २.३० वाजता हा भूमिपूजन सोहळा पार पडणार असल्याची माहिती जयकुमार गोरे यांनी दिली आहे. भूमिपूजन कार्यक्रमानंतर दहिवडीच्या बाजारपटांगणावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सभेत "आमचं ठरलंय" टीमला टार्गेट केले जाणार असल्याने माण-खटावच्या जनतेच्या नजरा आजच्या सभेकडे लागल्या आहेत. उत्तर भागातील ३२ गावांना लक्ष्मणराव इनामदार जिहेकठापूर उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी देण्याच्या योजनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. या योजनेद्वारे सदरील ३२ गवांना आंधळी धरणातून पाणी पुरवल्या जाणार आहे. याकामासाठी माजी आमदार जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याची फलश्रुती माण तालुक्यातील गावांना मिळाली आहे.
अगदी कमी कालावधीत या योजनेच्या तांत्रिक आणि शासकीय बाबी पार पाडण्यात आल्या. त्यानंतर या योजनेला कॅबिनेट मंत्रीमंडळाची सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनेच्या कामाचे टेंडरही निघाले आहे. आज दुपारी अडीच वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माण-खटावचे प्रभारी सदाशिवराव खाडे आणि जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या योजनेचे भूमिपूजन समारंभ पार पडणार आहे.