सातारा - जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत कराड आणि पाटण सोसायटी मतदार संघात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे अर्ज रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे कराड-पाटणमधील बिग फाईटकडे राज्याचे लक्ष वेधले आहे.
दोन साडूंचे राष्ट्रवादी उमेदवारांपुढे आव्हान -
सहकार मंत्री तथा सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासमोर माजी सहकार मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे पूत्र अॅड. उदयसिंह पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पूत्र सत्यजितसिंह पाटणकरांसमोर आव्हान निर्माण केले आहे. शंभूराज देसाई हे प्रथमच जिल्हा बँक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. पाटण सोसायटी मतदार संघात 103 तर कराड सोसायटी मतदार संघात 140 मते आहेत. दोन्ही मतदार संघातील निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राज्य पातळीवरून प्रयत्न झाले. परंतु, त्याला यश आले नाही. त्यामुळे दोन्ही मतदार संघात दोन मंत्री मैदानात राहिले आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आव्हान दिलेले गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई आणि उंडाळकर पूत्र अॅड. उदयसिंह पाटील हे नात्याने साडू आहेत. त्यामुळे कराड आणि पाटणमधील लढतीची सातार्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
कराड सोसायटीमधील लढत राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची -
कराड सोसायटी मतदार संघातील सहकार मंत्री विरुध्द उंडाळकर पूत्र ही लढत राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आमदार आहेत. सलग पाचवेळा ते आमदार झाले आहेत. यावेळी त्यांनी सोसायटी मतदार संघातून शड्डू ठोकला आहे. मागील निवडणुकीत गृहनिर्माण, पाणी पुरवठा मतदार संघात त्यांनी उदयनराजेंविरोधात निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सध्या ते स्वीकृत संचालक आहेत. आता समोरच्याच दाराने बँकेत जायचे, असा निर्धार करत त्यांनी कराड सोसायटी मतदार संघातूनच निवडणूक लढविण्याचा पवित्रा घेतला. परंतु, दिवंगत विलासकाका उंडाळकर यांचा हा पारंपारिक मतदार संघ असल्याने त्यांचे पूत्र अॅड. उदयसिंह पाटील यांनी देखील याच मतदार संघातून लढण्यावर ठाम राहत आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे कराड सोसायटी मतदार संघात बिग फाईट होणार, हे निश्चित आहे.
विलासकाका उंडाळकर होते सलग 54 वर्षे संचालक -