सातारा- कराड आणि पाटण तालुक्यांसह वाड्या-वस्त्यांना जोडणारा तांबवे येथील कोयना नदीवरील जुना पूल पाडण्यास सुरूवात झाली आहे. सुमारे 39 वर्षे या पुलावरून दळणवळण सुरू होते. हा पूल जमीनदोस्त होणार असल्याने जुन्या आठवणीही काळाच्या पडद्याआड जाणार आहेत.
स्वातंत्र्य सैनिकांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या तांबवे (ता. कराड) येथे कोयना नदीवर 1980 च्या दरम्यान पूल बांधण्यात आला. त्यापुर्वी नावेतून नागरीकांना ये-जा करावी लागत होती. नदीवर पूल झाल्यानंतर तांबवे परिसरातील दळणवळण सुकर झाले. तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांच्या हस्ते 1981 साली या पुलाचे उद्घाटन झाले होते. 12 गावे आणि आसपासच्या वाड्या-वस्त्यांच्या दळणवळणाची सोय या पुलामुळे झाली होती.
2019 च्या पुरात पूल बनला धोकादायक..
सातारा, सांगली जिल्ह्याला 2019 च्या महापुरात मोठा फटका बसला. त्यावेळी तांबवे येथील कोयना नदीवरील जुना पूल आठ दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली होता. पाण्याच्या प्रवाहामुळे पुलाचे लोखंडी अँगल तुटून वाहून गेले होते. तसेच पुलावर मोठे खड्डे पडले होते. पुरात वाहून आलेले लाकडाचे ओंडके अडकल्याने पिलरचेही नुकसान झाले होते. पुलाच्या पश्चिमेकडील दोन पिलर कमकुवत झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्याचवेळी जुन्या पुलाशेजारी नवीन उंच पुलाचे काम सुरू होते.