सातारा - विधान परिषदेतील भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, असे वक्तव्य केले आहे. यानंतर पडळकरांच्या या वक्तव्याचा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. भाजपच्या नेत्यांनी त्यांना समज द्यावी अन्यथा कडक कारवाई करणार असल्याचे संकेत शंभुराज देसाई यांनी दिले.
शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ, ऑडिओ क्लिप जमा करून त्यात आक्षेपार्ह आढळल्यास तत्काळ कारवाई करणार आहे, असेही गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले.
हेही वाचा -'गोपीचंद पडळकरांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज'
दरम्यान, पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मंगळवारी दिवसभर राजकीय वर्तुळात उमटले. यावर गृहराज्यमंत्री शंभू्राज देसाई यांनीही पडळकर यांच्यावर सडकून टिक केली आहे. ते म्हणाले, काल आमदार झालेल्या व्यक्तीने बेजबाबदार टिका करणे योग्य नाही. हे पूर्णपणे चुकीचे आणि बेजबाबदार आहे. त्यांची निंदा करावी तेवढी थोडीच आहे. याचे परिणाम त्यांना महाराष्ट्रात फिरताना दिसायला लागतील, या शब्दांत त्यांनी पडळकर आणि भाजपला इशारा दिला आहे.
काय म्हणाले होते पडळकर?
धनगर समाजाच्या आरक्षणावर शरद पवारांनी केवळ राजकारण केले आहे. बहुजनांवर देखील त्यांनी अत्याचार केले आहेत. हे नेतृत्व राज्याचे असू शकत नाही. शरद पवार हा राज्याला झालेला कोरोना आहे, अशी टीका पडळकर यांनी केली. धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर मागील फडणवीस सरकारने एक हजार कोटींची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या सरकारने अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद धनगर समाजासाठी केली नाही. त्यामुळे केवळ राजकारणासाठी पवारांना धनगर समाज लागतो, असा आरोपही त्यांनी केला.