सातारा :सातारा सर्वार्थाने पुढारलेला आणि पुरोगामी अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील कराडसारख्या सुजलाम्-सुफलाम् तालुक्यातील एका गावात तब्बल 46 वर्षांनी ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत उभी राहिली आहे. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील भवानवाडी, असे या गावाचे नाव. 1975 साली भवानवाडी ग्रामपंचायतीची स्थापना झाली होती. सेना-भाजप युती सरकारने सुरू केलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून भवानवाडी गावात आता ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत उभी राहिली आहे. आतापर्यंत या गावचा कारभार कसा चालायचा, याचा ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा.
ग्रामपंचायतीची 1975 ला स्थापना :भवानवाडी ग्रामपंचायतीची स्थापना १९७५ साली झाली. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असलेले भवानवाडी हे दीड हजार लोकसंख्येचे गाव. लोकसंख्येने छोट्या असलेल्या या गावाला स्थापनेपासून ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत नव्हती. भवानीमाता मंदिरालतच्या छोट्या खोलीतून गेली 46 वर्षे गावचा कारभार चालत होता.
छोट्या खोलीत ग्रामपंचायत कार्यालय :भवानवाडी गावचे दैवत असलेल्या भवानीमाता मंदिराशेजारी दहा बाय पंधराच्या छोट्याशा खोलीतूनच आजअखेर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय कारभार सुरू होता. 1975 पासून ग्रामपंचायतीला स्वतंत्र इमारत नसल्याची बाब ग्रामस्थांना खटकत होती. परंतु, राजकीय पातळीवर त्याची कोणीच दखल घेतली नाही, अशी खंत माजी उपसरपंच शिवाजी भोसले यांनी व्यक्त केली.