सातारा -एकतर्फी प्रेमात अपयशी झाल्याने सूडभावनेतून बालकाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे. अभिजित रामदास लोखंडे (वय 28, रा. तडवळे, ता. फलटण जि. सातारा) असे संशयिताचे नाव आहे.
'मला परत फोन, मेसेज करु नकोस. नाहीतर तुझे हे प्रकार घरातल्यांना सांगेन' हेच शब्द आरोपीच्या वर्मी लागले. आपले एकतर्फी प्रेम संपुष्टात आल्याच्या जाणिवेने तो बिथरला. याच रागातून त्याने अवघ्या 10 महिन्यांच्या बालकाचा क्षणाचाही विचार न करता विहिरीत फेकून खुन केला. फलटण तालुक्यातील अपहृत बालकाच्या खुन्याचा छडा कसा लागला याची तपशिलवार माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सातपुते यांनी सांगितले की, काळजमधील बालक अपहरण व खुनाचा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाल्याचे चौकशीदरम्यान समोर आले. बालकाच्या आईवर या संशयिताचे एकतर्फी प्रेम होते. मात्र, त्या बालकाची आई त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हती. भेटणे, बोलणेही टाळत होती. काही दिवसांपुर्वी दोघांत याच कारणावरुन वाद झाला. तिने तरुणाला परत फोन, मेसेज, भेटण्याचा प्रयत्न करु नकोस, असे सांगितले. त्यावरुन त्यांचे भांडणही झाले. याचा राग मनात धरुन अभिजित लोखंडे याने मंगळवारी बालकाचे अपहरण केले. तसेच त्याला जवळच्या विहिरीत टाकून तो पसार झाला.