सातारा -सातार्यातील हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेच्या पुरुष गटात औरंगाबादमधील प्रल्हाद घनवट तर महिला गटात माण तालुक्यातील रेश्मा केवटे यांनी पहिला क्रमांक पटकावला. प्रल्हाद घनवट हे सैन्य दलात असून ते जबलपूर (मध्य प्रदेश) येथे कार्यरत आहेत. त्यांनी ही स्पर्धा 1 तास 9 मिनिटांत पूर्ण केली. महिला गटात म्हसवड (ता. माण) येथील रेश्मा केवटे यांनी 1 तास 24 मिनिटात पुर्ण केली. पुरूष गटात मांढरदेव (ता. वाई) येथील कालिदास हिरवे यांनी दुसरा तर गडहिंग्लजमधील परशुराम भोई यांनी तिसरा क्रमांक पटकावला.
मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले स्पर्धक आशियाई चॅम्पियनच्या तयारीसाठी धावल्या रेश्मा केवटे -हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत महिला गटात म्हसवडच्या रेश्मा केवटे यांनी बाजी मारत माणदेशी डंका कायम ठेवला. त्यांनी ही स्पर्धा 1 तास 24 मिनिटांत पूर्ण केली. 2020 च्या सातारा मॅरेथॉन स्पर्धेतही त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना स्पर्धा पुर्ण करण्यासाठी 1 तास 32 मिनिटे लागली होती. यावेळी यांनी त्यापेक्षा कमी वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. त्या 42 किलोमीटरच्या अशियाई चॅम्पियनशीपची तयारी करत आहेत. त्यासाठी त्यांना ही स्पर्धा उर्जादायी ठरणार आहे.
मॅरेथॉन स्पर्धेचे यवतेश्वर घाटातील दृश्य साडे सात हजार स्पर्धकांचा सहभाग -मॅरेथॉनमध्ये यंदा साडेसात हजार इतके विक्रमी स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामुळे अकराव्या मॅरेथॉन स्पर्धेला देश आणि परदेशातील स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस परेड ग्राउंड येथून ढोल-ताशा आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरातया स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेला सकाळी साडे सहा वाजता सुरुवात झाली. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी झेंडा दाखविला. पोलीस परेड ग्राऊंड, पोवई नाका, रयत शिक्षण संस्था, नगर परिषद, शाहू चौक, माचीपेठ, अदालत वाडा, समर्थ मंदिर, बोगदामार्गे पुढे यवतेश्वर घाटातून नित्यमुक्त साई रिसॉर्टपर्यंत स्पर्धक धावले. त्यानंतर त्याच मार्गे स्पर्धक पोलीस परेड ग्राऊंडवर आले.
स्पर्धेच्या मार्गावर औषध, पाणी, बिस्किटे, स्प्रे कुलिंग स्टेशन्सची सोय - सातारा रनर्स फाउंडेशनच्यावतीने स्पर्धेच्या मार्गावर स्पर्धकांना पाणी, औषधे, बिस्किटे, वेदनाशामक, स्प्रे कुलिंग स्टेशन यासारख्या आवश्यक बाबींची सोय करण्यात आली होती. ढोल-ताशांनी स्पर्धकांमध्ये उत्साह निर्माण केला. पोलीस कर्मचायांसाठीही फूड पँकेटची व्यवस्था करण्यात आली होती. प्रथमोपचाराचे प्रशिक्षण घेतलेले सव्वा दोनशे स्वयंसेवक ठिकठिकाणी तैनात होते. स्पर्धकांना त्रास झाल्यास उपचारासाठी काही हॉस्पिंटलमध्ये राखीव बेड ठेवण्यात आले होते. स्पर्धेमुळे संपुर्ण शाहूनगरी मॅरेथॉनमय होऊ गेली होती. यवतेश्वर-कास मार्गावरील निसर्गरम्य वातावरण, कोवळे ऊन आणि रिमझिम पावसात धावणार्या स्पर्धकांची छायाचित्रे टिपण्यासाठी देशभरातून हौशी छायाचित्रकार देखील उपस्थित होते.