सातारा: मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिशांविरोधात 'चले जाव', चा नारा दिला. त्यानंतर देशभरात 'भारत छोडो' आंदोलनाला सुरुवात झाली. महात्मा गांधींनी 'चले जाव' चा नारा देताच संपूर्ण देशात 9 ऑगस्टला क्रांतीचा वणवा पेटला. हा दिवस क्रांती दिन म्हणून पाळायचे ठरल्यानंतर हा दिवस स्वातंत्र्याच्या इतिहासातील ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
चित्रिकरणामुळे इतिहास होतो जिवंत: महात्मा गांधी पुकारलेल्या भारत छोडो आंदोलनाचा ब्रिटिशांनी मोठा धसका घेतला होता. देशभरात आंदोलनाचा वणवा 'चले जाव' या नाऱ्यामुळे पेटला होता. या आंदोलनाचे पडसाद बघता ब्रिटिशांनी स्वांतत्र्य लढ्यातील कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यास सुरुवात केली. आंदोलनातील नेत्यांची धरपकड केली. दरम्यान त्या ऑगस्ट क्रांतीला आज 81वर्षे पूर्ण होत आहेत. ऑगस्ट क्रांतीच्या सर्व प्रसंगाचे सातार्यातील कॉम्रेड दादू रमजू यांनी केलेल्या चित्रिकरणामुळे क्रांतीचा इतिहास आजही जिवंत आहे.
मूव्ही कॅमेर्याने केले चित्रिकरण: मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिशांकडून कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. नेते मंडळींची धरपकड केली गेली. आंदोलनकर्त्यांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्या आंदोलनावेळी सातार्यातील हौशी छायाचित्रकार आणि कम्युनिस्ट कार्यकर्ता दादू रमजू हे त्यांच्या सहकार्यांसह उपस्थित होते. गवालिया टँक मैदानावरील त्या सर्व घटनांची त्यांनी छायाचित्रे काढली. तसेच सहकार्यांच्या मदतीने त्यांनी मूव्ही कॅमेर्याने सर्व प्रसंगाचे चित्रिकरणदेखील केले. त्यांनी चित्रिकरण केल्यामुळेच ऑगस्ट क्रांतीचा इतिहास चित्रफितीच्या रूपाने आजही जिवंत आहे. हा सर्व इतिहास जिवंत ठेवणारे दादू रमजू मात्र आज हयात नाहीत.
ब्रिटिशांनी कॅमेरा जप्त केला: कॉम्रेड दादू रमजू यांचे धाकटे बंधू आणि सातार्यातील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार एम.रमजू यांनी यासंदर्भातील महत्वाची आठवण सांगितली. गवालिया टँक मैदानावरील एका झाडाच्या आडून कॉम्रेड दादू रमजू हे चित्रिकरण करत होते. त्यावेळी एका ब्रिटिश सैनिकाने त्यांना पकडून अधिकार्यासमोर उभे केले. कॅमेर्यातील रोल काढून त्या अधिकार्याने दादू रमजू आणि त्यांच्या एका सहकार्याकडून कॅमेरा काढून घेतला. कॅमेरा परत मिळवण्यासाठी त्या दोघांनी एका पत्रकाराला मध्यस्थी घालून वरिष्ठ पोलीस अधिकार्याची प्रत्यक्ष भेट घेतली. त्या अधिकाऱ्याकडे कॅमेरा परत देण्याची विनंती दोघांनी केली.