सातारा - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चाचपणी करूनच सातारा लोकसभेऐवजी कराड दक्षिणमधून लढण्याचा निर्णय घेतला. मात्र, कराड दक्षिणच्या जनतेला पर्यटन करणारा आमदार नको असल्याने कराड दक्षिणची जनता पृथ्वीराज चव्हाणांची पन्नास वर्षांच्या सत्तेची मस्ती उतरवेल, अशी सणसणीत टीका कराड दक्षिणचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी केली.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी चेअरमन मदनराव मोहिते, व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, ज्येष्ठ नेते भीमरावदादा पाटील, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, निवडणुका जाहिर झाल्यानंतर काहीजण म्हणत होते कराड दक्षिणची लढत दुरंगी होईल, तर काहीजण म्हणत होते तिरंगी होईल. माजी मुख्यमंत्र्यांनी लोकसभेला चाचपणी केली आणि विधानसभेचाही अंदाज घेतला. पण कराडकर शहरासह ग्रामीण भागातील जनतेने त्यांचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. कारण मतदारसंघात पर्यटन करण्यापुरता येणारा लोकप्रतिनिधी जनतेला नको आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांची पन्नास वर्षांची सत्तेची मस्ती येत्या निवडणुकीत व्याजासह कराडकर उतरवतील.