सातारा- लोकनेते दिवंगत यशवंतराव चव्हाणांचे नाव घेणार्यांना यशवंतरावांच्या समाधीस्थळाभोवती पूरसंरक्षक भिंतही उभारता आली नाही. उलट मुख्यमंत्री असताना त्यांनी कराडकरांच्या मानगुटीवर बसविलेले शंभर फुटी रस्त्याचे भूत आम्हीच उतरवले, असा टोला महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी मारला. कराड येथे प्रचार सभेत ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, भाजप सरकार विकासाला प्राधान्य देणारे आहे. कराड शहराच्या विकासासाठी भाजप सरकारने भरघोस निधी दिला आहे. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या समाधीस्थळाच्या संरक्षक भिंतीचा प्रश्नही मार्गी लावल्याचे सांगत डॉ. भोसले म्हणाले, प्रीतिसंगम घाट टूरिझम डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याचा आमचा मानस आहे. कृष्णा नदीच्या स्वच्छतेसाठी नमामी कृष्णा सारखा प्रोजेक्टही आम्ही राबविणार आहोत. मुख्यमंत्री असताना त्यांनी कोणताही रोजगार निर्माण केला नाही. परंतु, आता गाडीत बसायला 200 रूपये, घोषणा देण्यासाठी 400 रूपये आणि घालून-पाडून बोलण्यासाठी 10 हजार रूपये देऊन त्यांनी काही माणसे पोसण्याचा उद्योग केला आहे. त्यांचे हे दुकान 21 तारखेपर्यंतच उघडे राहणार आहे. त्यानंतर त्यांच्या दुकानाला कायमचे कुलुप लागणार आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा -श्रमिक मुक्ती दलाचा अॅड. उदयसिंह उंडाळकरांना पाठिंबा; डॉ. पाटणकरांची घोषणा