सातारा - जावळी तालुक्यातील एका 10 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी 65 वर्षांच्या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. हे प्रकरण 25 हजार रुपये देऊन गावातच दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ जणांना मेढा पोलिसांनी सहआरोपी करत अटक केली आहे.
25 हजारांची पीडित कुटुंबीयांना दाखवली आमिष -
गणेश ज्ञानेश्वर पवार, प्रमोद कृष्णा कांबळे, केशव तुकाराम महामुलकर, अशोक ऊर्फ आनंदा निवृत्ती महामुलकर, दिलीप दिनकर महामुलकर अशी मध्यस्ती करु पाहणाऱ्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्यावर अतिसंवेदनशील गुन्ह्याची तक्रार दाखल न करण्यासाठी 25 हजार रुपयांचे आमिष दाखवून पीडित कुटुंबीयांना धमकावून प्रकरण मिटून घेण्यास सांगितल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. बालिका अत्याचार प्रकरणी संशयित बबन उर्फ बबलिंग जगन्नाथ सपकाळ (वय 65) याला यापुर्वीच अटक करण्यात आली आहे. यात आणखी पाच जणांचा समावेश झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
धमकावत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता चौथीत शिकणारी, 10 वर्षांची पिडीत मुलगी मैत्रिणीबरोबर खेळत होती. त्यावेळी तिला हाताला धरून एका छप्परात नेऊन लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर मुलीला नाव सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यासंदर्भात मेढा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बबन सपकाळला अटकही केली आहे. त्यापुर्वी पोलिसांत तक्रार होऊ नये म्हणून त्याने गावातील ४-५ लोकांना मध्यस्ती करायला लावून पीडितेच्या कुटुंबीयांवर दबाव टाकत गावातील प्रकरण गावातच मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पीडितेच्या कुटुंबियांना 25 हजार रुपये देण्याचे अमिष दाखवले होते.