सातारा -संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात सातारा जिल्ह्यात आगमन झाले ( Sant Dnyaneshwar Maharaj Palakhi In Satara ) आहे. पाडेगाव येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. माऊलींच्या पादुकांचा नीरा नदीत स्नान सोहळा पार पडला. भगव्या पताका, टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामात तल्लीन झालेले वारकरी, भाविक भक्तीरसात चिंब होऊन गेले.
नीरा स्नान सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. हा स्नान सोहळा पाहण्यासाठी नदीवरील पुलावर भाविकांची गर्दी उसळली होती. नीरा नदीतील स्नानानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पाडेगाव (ता. खंडाळा) आगमन झाले. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. सातार्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.