कराड (सातारा)- सिंधुदुर्ग जिल्ह्यातीत माडखोल (ता. सावंतवाडी) गावातील जंगलात सिंगल बोअरच्या बंदुकीने दोन शेकरूंची शिकार करणाऱ्या सैन्य दलातील जवान लिलाधार मिनोनाथ वराडकर या जवानास वनविभागाने अटक केली. याप्रकरणी कराडचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचा पाठपुरावा सुरू होता. तब्बल सात दिवसांनी त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. दरम्यान, संशयितास आज न्यायालयात हजर केले असता त्याला १४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही या प्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत शेकरूला वाघाच्या दर्जाचे संरक्षण लाभले आहे. तसेच शेकरू हा महाराष्ट्राचा 'राज्यप्राणी' आहे. गेल्या आठवड्यात साधारण 1 ते 3 एप्रिल दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात असलेल्या माडखोल गावातील जंगलात दोन शेकरूंची शिकार झाल्याची घटना उघडकीस आली होती. परंतु, लाॅकडाऊनचे कारण पुढे करून शिकाऱ्याला अटक करण्यास टाळाटाळ केली जात होती. शिकार केलेल्या प्राण्यांसह शिकाऱ्याने काढलेले छायाचित्र आणि संशयीत आरोपीची माहिती वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे सदस्य आणि कराड येथील मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी गोपनीयरित्या मिळविली.