महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंनिस'चा आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे, तर जीवनगौरव पुरस्कार प्रभाताई पुरोहित यांना जाहीर

'अनिस'चा आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना, तर जीवनगौरव पुरस्कार प्रभाताई पुरोहित (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. याशिवाय समितीच्या इतर राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणाही आज झाली.

अनिसचा आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे
अनिसचा आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे

By

Published : Oct 5, 2021, 6:55 AM IST

Updated : Oct 5, 2021, 7:00 AM IST

सातारा - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आगरकर पुरस्कार सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना, तर जीवनगौरव पुरस्कार प्रभाताई पुरोहित (मुंबई) यांना जाहीर झाला आहे. याशिवाय समितीच्या इतर राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणाही आज झाली.

लवकरच एका कार्यक्रमात हे सर्व पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जातील, अशी माहिती 'अंनिस'चे राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार यांनी दिली. त्यांनी सांगितले, ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने दिला जाणारा ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार’ ज्येष्ठ लेखक-विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे (कोल्हापूर) यांना जाहीर करण्यात येत आहे. सन्मानपत्र व 15 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. याआधी हा आगरकर पुरस्कार डॉ. श्रीराम लागू, विद्या बाळ, निखिल वागळे, डी. डी. बंदिष्टे, प्रभाकर नानावटी, भुरा सिंग यांना देण्यात आला होता.

जीवनगौरव पुरस्कार - प्रभाताई पुरोहित(मुंबई) -

समितीचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ यावर्षी मुंबई येथील ‘अंनिस’च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या प्रा. प्रभाताई पुरोहित यांना जाहीर झाला आहे. सन्मानपत्र व 15 हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रभाताई या अंधेरीच्या भवन्स महाविद्यालयातून निवृत झाल्यानंतर गेली 20 वर्षे ‘अंनिस’च्या कामात सक्रिय आहेत. त्या अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मांधांची झुंडशाही अशा विविध विषयांवर वर्तमानपत्रात सतत लेखन करत असतात.

ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार-संतराम कर्हाड व वसंतराव टेंकाळे -

‘सुधाकर आठल्ये ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार’ अंबाजोगाई येथील ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते संतराम दौलतराव कर्हाड आणि लातूर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव टेंकाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र व प्रत्येकी 10 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. संतराम कर्हाड हे बीडचे 1991 पासून सक्रिय कार्यकर्ते आहेत. ‘वसंतराव टेंकाळेसरांनी 100 पेक्षा जास्त सत्यशोधकी आणि आंतरजातीय विवाह आयोजित करण्यात भरीव योगदान दिले आहे.

उदयकुमार कुर्हाडेंना युवा कार्यकर्ता पुरस्कार -

सुधाकर आठल्ये युवा कार्यकर्ता पुरस्कार येवला (जि. नाशिक) येथील ‘अंनिस’चे कार्यकर्ते उदयकुमार श्रीराम कुर्हाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानपत्र व 10 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. युवा साथी उदयकुमार कुर्हाडे हे विद्यार्थिदशेत असतानाच ‘अंनिस’च्या कामाशी जोडले गेले. ते विद्यार्थिप्रिय उपक्रमशील शिक्षक असून शासनाच्या शालेय अभ्यासक्रम कमिटीवर ते या तरुण वयात काम करत आहेत.

'सावित्रीमाई फुले'ने विजयाताईंचा सन्मान -

सावित्रीमाई फुले पुरस्कार नागपूर ‘अंनिस’च्या ज्येेष्ठ कार्यकर्त्या विजयाताई चंद्रकांत श्रीखंडे यांना देण्यात येत आहे. सन्मानपत्र व 10 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. श्रीखंडे पती-पत्नी हे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या व्याख्यानातून प्रभावित होऊन ‘अंनिस’च्या कामाशी जोडले गेले. दरम्यान भटक्या-विमुक्त जाती-जमातीतील अघोरी प्रथा, चाली-रीती याविषयी प्रबोधनकार्य करणा-या कार्यकर्त्यांचा प्रबोधन पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. यावर्षी हा प्रबोधन पुरस्कार इचलकरंजी येथील ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्ते विनायकराव चव्हाण यांना देण्यात येत असल्याचे समितीचे राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार यांनी सांगितले.

हेही वाचा - ड्रग्स पार्टी प्रकरण : शाहरुख खानच्या मुलाने घरचे जेवण नाकारले!

Last Updated : Oct 5, 2021, 7:00 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details