महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर अ‍ॅन्जिओप्लास्टी, मिळाले जीवनदान - Corona Patient Angioplasty karad

गेल्या सात महिन्यात कोविड रुग्णावर अ‍ॅन्जिओप्लास्टी होण्याची पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. कृष्णा हॉस्पिटलला महात्मा फुले जीवनदायी योजना लागू असल्याने ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली. रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर सध्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ही रुग्णावर अ‍ॅन्जिओप्लास्टी
कराडमध्ये कोरोना पॉझिटिव्ही रुग्णावर अ‍ॅन्जिओप्लास्टी

By

Published : Oct 7, 2020, 4:55 PM IST

सातारा- जन्मत: मूकबधीर असणार्‍या आणि कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ४० वर्षीय रुग्णावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वी अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्यात आली. या उपचारामुळे रुग्णाला जीवनदान मिळाले आहे. कृष्णा हॉस्पिटलमधील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी ही शस्त्रक्रिया केली.

कोरोना परिस्थिती उद्भवल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांवर अ‍ॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया होण्याची पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. रुग्णाच्या छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला एका रुग्णालयात नेले. डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी हृदयविकार तज्ज्ञांना दाखवण्याचा सल्ला दिला. एका रुग्णालयात सर्व तपासण्या केल्यावर त्या रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन गेल्याचे स्पष्ट झाले. अ‍ॅन्जिओग्राफी केल्यानंतर हृदयाच्या दोन रक्तवाहिन्यांमध्ये शंभर टक्के आणि ऐंशी टक्के असे अतिगंभीर ब्लॉकेज आढळून आले. रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अ‍ॅन्जिओप्लास्टी हा एकमेव मार्ग होता. परंतु, त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ही शस्त्रक्रिया त्याला परवडणारी नव्हती. त्यामुळे, त्याने शस्त्रक्रियेसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा निर्णय घेतला.

कृष्णा हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी कोविड चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे, आणखी एक समस्या उभी राहिली. एका बाजूला गंभीर हार्ट अटॅक, क्रिटिकल ब्लॉकेज आणि दुसर्‍या बाजूला तितकाच गंभीर असा कोरोनाचा धोका. पण, कृष्णा हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. अभिजीत शेळके व मेडिसीन विभागाचे डॉ. व्ही. सी. पाटील यांच्याशी चर्चा करून रुग्णावर तातडीने अ‍ॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला.

रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याने हृदयरोग तज्ज्ञ डॉ. साबळे व त्यांच्या सहकार्‍यांनी संभाव्य धोके ओळखून योग्य ती खबरदारी घेत आणि आपले कौशल्य पणास लावत पुढच्या अर्ध्या तासात दोन्ही ब्लॉकेज स्टेण्ट बसवून उघडले आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी वैद्यकीय स्टाफला केलेल्या मार्गदर्शनाचा शस्त्रक्रियेसाठी फायदा झाल्याचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या सात महिन्यात कोविड रुग्णावर अ‍ॅन्जिओप्लास्टी होण्याची पश्चिम महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे. कृष्णा हॉस्पिटलला महात्मा फुले जीवनदायी योजना लागू असल्याने ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत झाली. रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर सध्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा-हाथरसमध्ये अस्मिता अन् न्यायव्यवस्था गाडली गेली - डॉ. सविता मोहिते

ABOUT THE AUTHOR

...view details