सातारा- भारतालगतच्या नेपाळ, भूतान, बांग्लादेशचा विकासदर सरासरी साडेसात टक्के असताना भारताचा विकासदर साडेपाच टक्क्यांवर आला आहे. विकासदरावरून केंद्र सरकार जनतेचे लक्ष विचलित करत आहे. राज्य सरकारने तर कोटींच्या घोटाळ्यांची उड्डाणे केली असल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
भाजप सरकारच्या कालावधीत सिडकोची 17 हजार कोटींची जमीन केवळ तीन कोटीला विकण्यात आली. याच सरकारच्या कालावधीत पंकजा मुंडे यांचा चिक्की घोटाळा, अंगणवाडी घोटाळा, प्रकाश मेहतांचा गृहनिर्माण घोटाळा, विनोद तावडे यांचा घोटाळा, असे अनेक घोटाळे बाहेर आले. आतापर्यंत या सरकारवर सर्वात जास्त घोटाळ्यांचे आरोप झाले असल्याचे गाडगीळ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री जाहीरपणे आमच्या सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, असे सांगत आहेत. यासारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. देशाची अर्थव्यवस्था अतिशय वाईट झाली आहे. देशात मोठ्याप्रमाणावर मंदीची लाट आहे. लाखो युवक बेरोजगार होत आहेत. जीएसटी, नोटाबंदी अशा निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धोका पोहोचला आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर दहशतवादी हल्ल्यात वाढ झाली आहे. काळा पैसा देशात आणू म्हणणारे किंवा सर्वसामान्यांच्या खात्यावर 15 लाख रुपये भरू म्हणून सांगणारे आत्ता त्याबाबत काहीही बोलत नाहीत. बँक घोटाळ्यांमध्ये दरवर्षी वाढ होत असून यंदा लाखाच्या घरात बँक घोटाळा गेला असल्याचा आरोपही गाडगीळ यांनी केला.