सातारा- जनता 2014 ला जाहिराती बघून फसली. जाहिराती बघून तेल आणि साबण घ्यायचा असतो, मतदान करायचे नसते, हे आता जनतेच्या लक्षात आले आहे. युतीने कर्जमाफी केली. तीही सरसकट नाही, तर 66 अटी घालून केली. कर्जमाफीची पोकळ घोषणा करून हे सरकार शेतकऱ्यांना खेळवतंय. परंतु, याद राखा...मौका सभी को मिलता है! असा इशारा राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
ढेबेवाडी येथे पाटण मतदार संघातील महाआघाडीचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रचार सभेत अमोल कोल्हे बोलत होते. 1 हजार 800 कोटींचा विकास झाल्याचे कागदावर सांगू नका. प्रत्यक्षात विकास दाखवा, असा शंभूराजेंना टोला मारून श्रीनिवास पाटील, सत्यजितसिंह पाटणकर या दोघांना विजयी करण्याचे आवाहन कोल्हेंनी केले.
हेही वाचा - महाराष्ट्रात सरकारची कोट्यावधींच्या घोटाळ्यांची उड्डाणे; अनंत गाडगीळांचा हल्लाबोल
यावेळी कोल्हे म्हणाले, एकदा चूक झाली, ती सुधारण्याची संधी 5 वर्षांनी येते. परंतु, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेली चूक सुधारण्याची संधी 6 महिन्यांतच आली आहे. महाराष्ट्रात रोजगार निर्मिती थांबली आणि देशाचा विकास दर घसरत चालला आहे. हीच का सरकारची उभारी? माझ्यासमोर कोणी पैलवानच नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात. मग पंतप्रधान, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्या सभा का घेत आहात, असा सवाल कोल्हे यांनी केला.