सातारा- आंबेनळी घाट आणि पार फाटा ते देवळी हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सोमवारी (दि. 20 जून) बंद राहणार असल्याची माहिती महाबळेश्वर सावर्जनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांनी दिली आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी आंबेनळी घाटातील वाहतूक आज बंद गतवर्षी कोसळल्या होत्या दरडी -जुलै, 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये आंबेनळी घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. दगड, माती, वृक्ष रस्त्यावर आल्याने मोरीवरील पुलांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले होते. रस्ते, पूल वाहून गेले होते. त्या सर्व ठिकाणी सध्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
तातडीने कामे पूर्ण करण्याची सूचना -आमदार मकरंद पाटील यांनी नुकसानीची पाहणी करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तसेच पावसाळ्यात रस्ता बंद राहणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार महाबळेश्वर सावर्जनिक बांधकाम उपविभागाने कामाचे नियोजन केले आहे. सोमवारी (दि .20) महाबळेश्वर पोलादपूर या रस्त्यावरील किल्ले प्रतापगड फाटा ते मेटतळे या दरम्यानचा घाटरस्ता व कुंभरोशी येथून पारफाटा ते देवळी हा रस्ता दुरूस्तीच्या कामामुळे सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
'ही' कामे पूर्ण होणार -रस्त्यामध्ये पाईप टाकणे, डोंगराकडील सुटलेला भाग काढून घेणे. नदी, नाले, ओढ्यांच्या पात्रातील अडथळे दूर करून पाण्याच्या प्रवाहाला नैसर्गिक मार्ग मोकळा करून देण्याची कामे पूर्ण केली जाणार आहेत. या कामांमुळे घाट बंद राहणार असल्याची माहिती उपविभागीय अभियंता महेश गोंजारी यांनी दिली आहे.
हेही वाचा -Satara Accident : वारकऱ्यांवर काळाचा घाला; ट्रॉली अपघतात एकाचा मृत्यू, 30 जण जखमी