सातारा- माण खटाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर देशमुख यांच्या बरोबर 'आमचं ठरलयं' मध्ये सर्व पक्षीय नेते मंडळी आहेत की नाहीत, या प्रचाराला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आज सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी देशमुख यांना आपला उमेदवार म्हणून जाहीर केले .
या पत्रकार परिषदेत माजी आमदार प्रभाकर घार्गे (राष्ट्रवादी) ,माजी आमदार दिलीप येळगावकर (भाजपा), अनिल देसाई (भाजपा), रणजितसिंह देशमुख (शिवसेना), अनिल पवार (स्वाभिमानी शेतकरी संघटना), मामुशेठ वीरकर (राष्ट्रीय समाज पक्ष), संदीप पोळ (राष्ट्रवादी काँग्रेस), काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. विवेक देशमुख, अशोक गोडसे, संदिप मांडवे, सुरेंद्र गुदगे, दिलीप तुपे, सत्यवान कमाने आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आमदार दिलीप येळगावकर म्हणाले की, माण-खटाव तालुक्यातील गुंडगिरी संपुष्टात येण्यासाठी, सुसंस्कृत माणसे राजकारणात आली पाहीजेत. यासाठी माण मतदारसंघात परिवर्तन होणे काळाची गरज आहे. माण – खटाव मतदारसंघातील लोकप्रतिनिधीच्या दहशतीला आवर घालायची असेल तर त्यांचा पराभव होणे गरजेचे आहे. प्रभाकर देशमुख अत्यंत सभ्य, मनमिळावू, हुशार, दुरदृष्टी असलेली व्यक्ती आहे. त्यामुळे देशमुख यांना आम्ही पाठींबा देत आहोत, अशी भावना या मान्यवरांनी व्यक्त केली.