सातारा -लोकसभा पोटनिवडणूक आणि कराड दक्षिण विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर विविध राजकीय नेते-कार्यकर्ते सामाजिक सलोख्यासाठी कराडमध्ये एकटवले आहेत.निवडणूक (इलेक्शन) झाली आहे. आता सर्वांनी संबंध (रिलेशन) जपावे, असे आवाहन विविध मान्यवरांनी प्रीतीसंगम येथील बागेत नागरिकांना केले.
कराडमधील सर्व पक्षांचे पदाधिकारी, विद्यमान आणि माजी नगरसेवक व नागरिक यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रीतिसंगमावरील बागेत मंगळवारी एकत्र आले. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन कराडचा लौकीक आणि सामाजिक एकात्मता जपावी, असे यावेळी आवाहन नागरिकांना करण्यात आले.
संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी अशी कराडची ओळख आहे. निवडणुकीनंतर सामाजिक एकता जपण्याच्या उपक्रमाद्वारे पुन्हा राज्याला नवी दिशा देण्याचा कराडकरांनी स्तुत्य प्रयत्न केला आहे. यशवंतराव यांचे विचार जपत राजकारण, समाजकारण केलेले आमदार पी. डी. पाटील यांचे नातू आणि कराडचे नगरसेवक सौरभ पाटील यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला.