सातारा - माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उमेदवारी जवळजवळ नक्की झाली आहे. यापार्श्वभुमीवर माढा मतदारसंघातील दिग्गज राजकीय मंडळीची बैठक शनिवारी पार पडली. माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या बोराटवाडी येथील निवासस्थानी अनेक नेते रात्री एकत्र आले होते. या बैठकीत नक्की काय चर्चा झाली, यावर प्रश्न निर्माण झाले आहेत.
आमदार गोरे यांच्या बंगल्यात राजकीय मंडळींची बैठक; माढ्यात नेमकं शिजतय तरी काय?
या बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सातारा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर तसेच उमेशपंत परिचारक उपस्थित होते.
या बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सातारा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर तसेच उमेशपंत परिचारक उपस्थित होते. निवडणूक प्रचारादरम्यान सर्व नेत्यांना विश्वासात घेतले जावे, या मुद्द्यावर या बैठकीत खलबते झाल्याचे समजते.
काँग्रेस राष्ट्रवादीची युती झाल्यानंतर माढ्यातून खुद्द राष्ट्रवादीच्या अध्यक्षांची उमेदवारी निश्चित झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परिणामी काँग्रेसच्या नेत्यांना पवारांना निवडून आणण्यासाठी एकत्र काम करावे लागणार आहे. दरम्यान, पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी या गटाची अशाच प्रकारे बैठक सोलापूरमध्ये झाली होती. त्यावेळी माढ्यातून सर्वपक्षीय उमेदवार उभा करण्याचा विषय पुढे आला होता. मात्र, आता पवारांनाच उमेदवारी जाहीर केल्यामुळे सर्व शक्यता बाजूला पडल्या आहेत.
आमदार गोरे यांचा माण-खटाव आणि फलटण मतदारसंघावर मोठा प्रभाव आहे. माण-खटावमधील राष्ट्रवादीमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी पक्षाध्यक्षांना मदत करणार, की भाजपच्या वाटेवर जाणार, हे बघणे गरजेचे आहे. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातील ३ तालुक्यावर असणारी पकड गोरे कोणत्या प्रकारे वापरतात, हे येणारा काळच ठरवेल.