सातारा: राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचा खरपूस समाचार घेतला. कराड-चिपळूण रस्त्याची अवस्था काय आहे? पाटण तालुक्याचे प्रतिनिधी काय करतात? वीज वितरणच्या ठेकेदारांना दमदाटी केली जाते. टेंडर रद्द केली जातात. अधिकाऱ्यांनी दबावात काम करू नये, असे अजित पवारांनी अधिकाऱ्यांना सल्ला दिला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील उदाहरण देताना अजित पवार म्हणाले की, काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्यांना जनतेने नाकारले आहे. शिवसेनेत मोठे होऊन मंत्री झालेल्यांनी शिवसेनेशी गद्दारी करत बाळासाहेबांच्या मुलाला सत्तेबाहेर काढले. अशा गद्दारांची विश्वासार्हता काय ? भविष्यात ते जनतेशी तरी विश्वासू राहणार का? असा टोलाही अजित पवार यांनी शंभूराज देसाईंना लगावला.
शड्डू ठोकून विकास होत नाही-पाटण बाजार समितीची सत्ता मिळाल्यानंतर विजयी मिरवणुकीत शड्डू ठोकणाऱ्या शंभूराज देसाईंना अजितदादांनी टोला लगावला. आपली तब्येत काय? आपण बोलतो किती? शड्डू ठोकून पाटण मतदार संघाचे प्रश्न सुटणार आहेत का? समस्या सुटणार आहेत का?, असे सवाल माजी उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. पाटण तालुक्यात सायरन वाजला की लोक म्हणतात, पन्नास खोके, एकदम ओके, असा टोला अजित पवार यांनी शंभूराज देसाईंना लगावला. महाविकास आघाडीत जो मतदार संघात ज्याच्या वाट्याला येईल त्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले.