सातारा - आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची उद्या (शनिवारी) पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कराड दौऱ्यावर आहेत. रात्री उशीरा ते कराडमध्ये येणार असून कराडमधील नव्या आणि जुन्या विश्रामगृहात त्यांचा मुक्काम आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कराड दौऱ्यावर : संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी आणि कराडमधील यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन, अशा संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कराड दौऱ्यावर येत आहेत. सकाळी १०.३० वाजता त्यांचे कराड विमानतळावर आगमन होईल. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक प्रदर्शनाचे ते उद्घाटन करतील.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून अपात्रतेची मागणी :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार, असे गट पडले आहेत. तसेच अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा देखील सांगितला आहे. एकमेकांच्या आमदार, खासदारांना अपात्र करण्याची मागणी दोन्ही गटांकडून लोकसभा आणि विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आलेली आहे. पक्षीय वाद सुरू असल्याने अजितदादा आणि सुप्रिया सुळे उद्या प्रीतिसंगमावर एकत्र येणार का? याचीच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.