सातारा : फलटण येथील निंबकर अग्रीकल्चरल रिसर्च डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटचे संस्थापक, प्रख्यात निंबकर बियाण्यांचे उत्पादक पद्मश्री बनविहारी विष्णू तथा बी. व्ही. निंबकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. त्यांनी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. काल (25 ऑगस्ट) सायंकाळी ४ वाजता फलटण-लोणंद रोडवरील निवासस्थानाच्या परिसरात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
अरिझोना विद्यापीठात शिक्षण
दिवंगत विष्णू निंबकर आणि दिवंगत कमला निंबकर (पूर्वाश्रमीच्या एलीझाबेथ लुंडी) यांच्या पोटी कृषितज्ञ बी. व्ही. निंबकर यांचा जन्म १७ जुलै १९३१ रोजी झाला होता. न्यू टाऊन, पेन सिल्वानिया येथील क्वेकर संचलित जॉर्ज स्कूल येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले होते. त्यांनी अरिझोना विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते भारतात परतले होते. दरम्यान दिनकरराव कर्वे व इरावती कर्वे यांच्या सुकन्या जाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.
कापूस बियाणे आणि दख्खनी मेंढीचे संशोधन
निंबकर कापूस बियाण्याच्या माध्यमातून त्यांनी फलटण, बारामती, अकलूज, पंढरपूर या प्रमुख कापूस उत्पादक तालुक्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला सुधारित कापूस बियाणे उपलब्ध करुन दिले. त्याचबरोबर अधिक लोकर व मांस उत्पादन देणाऱ्या मेंढरांच्या प्रजाती संशोधीत करुन मेंढपाळांच्या जीवनात परिवर्तन घडवण्याच्या कामात त्यांनी मोठे यश प्राप्त केले होते.
निंबकर सिड्स नावाने बियाणे
भारतात परतल्यानंतर १९५६ मध्ये त्यांनी महाराष्ट्रात फलटण (जि. सातारा) या तालुक्याच्या ठिकाणी परंपरागत शेती सुरुवात केली. त्याचबरोबर रॉकफेलर फाऊंडेशन यांच्या आर्थिक सहाय्यातून निंबकर सिड्स या नावाने बियाणे उत्पादन व प्रक्रिया व्यवसाय सुरु केला होता. १९६८ मध्ये निंबकर अग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट (नारी) या नावाने 'ना नफा, ना शासकीय अनुदान' या तत्वावर शेतीमध्ये प्रगत संशोधन करणारी संस्था स्थापन केली होती. या संस्थेने अक्षय ऊर्जा, पशूपालन व शाश्वत विकास या उपक्रमांचा सहभाग वाढवला. त्यांच्या नारी या संस्थेला शुद्ध बोअर जातीच्या शेळ्या भारतामध्ये प्रथम पैदास करण्याचे श्रेय दिले जाते.
'पद्मश्री'ने सन्मानित
या संस्थेने विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. विशेषतः सन २००९ चे शाश्वत विकास पारितोषिक या संस्थेच्या कंदील व स्टोव्हला मिळाले. नारी सुवर्णा नावाने दख्खनी मेंढी पैदास, औद्योगिक ज्वलनासाठी लुस बायोमास गॅसिफायरचा विकास, बोकडाच्या गोठवलेल्या वीर्याचा वापर करुन कृत्रीम रेतन पद्धतीचा विकास, उच्च उत्पन्न देणाऱ्या दक्षिण आफ्रिकन बोअर मेंढीचे प्रजनन आणि संकरित गोड ज्वारीच्या वाणाचा विकास आदी विविध क्षेत्रात त्यांच्या या संस्थेने संशोधन केले आहे. या उपक्रमांमुळे संस्थेला विविध पुरस्काराने गौरवण्यात आले. भारत सरकारने त्यांना २००६ मध्ये 'पद्मश्री' या नागरी पुरस्काराने सन्मानित केले. तर जमनालाल बजाज पुरस्कारही २००९ मध्ये बहाल करण्यात आला होता.
हेही वाचा -नाशकात भाजपाकडून मुख्यमंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार