सातारा- छत्रपती शिवाजी महाराज यांना देशातच नव्हे तर जगात मोठे स्थान आहे. अशा छत्रपतींचे वंशज खासदार उदयनराजे यांच्याबद्दल पुन्हा बेताल वक्तव्य कराल तर प्रकाश आंबेडकर यांना जशासतसे उत्तर उदयनराजे प्रेमी व राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते देतील, असा गर्भित इशारा उदयनराजे भोसले समर्थकांनी साताऱ्यात बोलताना दिला.
खासदार उदयनराजे भोसले यांच्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात केलेल्या वक्तव्यामुळे साताऱ्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले. खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी अॅड. आंबेडकर यांच्या वक्त्व्याचा खरपूस समाचार घेतला. अशा प्रकारचे वक्तव्य परत खपवून घेणार नाही. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांच्याबद्दल जगाला आदर आहे. त्यामुळे भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी प्रकाश आंबेडकर यांनी घेणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया उदयनराजे समर्थकांतून उमटल्या.