सातारा - शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेगुरुजी यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब या गावी जाऊन भेट घेतली. भाजप खासदार उदयनराजेंच्या भेटीनंतर लगेच भिडेगुरुजींनी मंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय निरीक्षकांनी भुवया उंचावल्या आहेत.
राजकीय वतुर्ळात कुतूहल -
कालच भाजपाचे राज्यसभा सदस्य उदयनराजे भोसले यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तराफ्याचा सुकाणू हातात घेत उदयनराजे दरे तर्फ तांब या गावी गेले होते. दोघांतील खोलीबंद चर्चेमुळे राजकीय वतुर्ळात कुतूहल निर्माण झाले आहे. संभाजी भिडे गुरुजी यांना उदयनराजे खूप मानतात. दोघांतील सख्य सर्वश्रुत आहे. या पार्श्वभुमीवर भिडेगुरुजी मंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात तर्क लढवले जात आहेत.
तर्कांना उधाण -
खासदार उदयनराजे यांनी मराठा आरक्षण व सातारा शहरातील विविध विकासकामे याबाबत भेट घेतल्याचे सांगितले. मात्र, लगेचच दुसऱ्या दिवशी भिडेगुरुजी यांनी भेट घेतल्याने या दोन्ही भेटीमधून नक्कीच वेगळे काय तरी घडणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. भिडेगुरुजी यांना भेटीबाबत विचारले असता त्यांनी भेटीचे कारण स्पष्ट केले नाही. मात्र, एका तासाहून अधिक काळ चाललेल्या खोलीबंद चर्चेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधान आले आहे. मात्र मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले.
फणसाच्या झाडाचे वृक्षारोपण -
मंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेतीची भिडेगुरुजी यांनी पहाणी केली. शिंदे यांच्या शेतात गुरुजींच्या हस्ते फणसाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
हेही वाचा -शिवसागरातून तराफा चालवत उदयनराजे पोहोचले मंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड झाली खलबते