सातारा -कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद Koyna dam Six gates closed करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीज गृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात प्रतिसेकंद १३ हजार ८१४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसाचा जोर आणि आवक कमी झाल्याने नद्यांची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे.
दहा दिवसांनी दरवाजे बंद :कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्यानंतर धरण व्यवस्थापनाने दि. ११ ऑगस्ट रोजी पायथा वीजगृह कार्यान्वित करून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी (दि. १२ ऑगस्ट) धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटाने उघडून ८००० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले होते. १५ ऑगस्टनंतर दरवाजे साडे चार फुटांनी उघडण्यात आले होते. पायथा वीजगृह आणि दरवाजांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करता आली. पावसाचा जोर ओसरल्याने दहा दिवसांनी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.