महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पन्नास हजारांची लाच घेताना साताऱ्यात वकिलाला अटक

निकाल पक्षकाराकडून लावण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारताना अॅड. शिवराज पाटील यांना सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी संशयित वकिलावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्रहीत छायाचित्र

By

Published : May 15, 2019, 5:01 PM IST

सातारा- ग्राहक न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल तुमच्या बाजूने लावण्यासाठी न्यायालयातील न्यायाधीशांनी पैसे मागितले आहेत. असे सांगून पक्षकाराकडून ५० हजारांची लाच स्वीकारताना अॅड. शिवराज पाटील यांना सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्या वकिलाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की या प्रकरणातील तक्रारदाराचा सातारा येथील ग्राहक न्यायालयात खटला सुरू आहे. अॅड. शिवराज मारुती पाटील (वय ३०, रा. निगडी ता. कराड) हे तक्रारदार पक्षकाराचे वकील आहेत. अॅड. पाटील यांनी तक्रारदाराला निकाल तुमच्या बाजूने लावायचा असेल तर न्यायालयाने सुमारे १ लाख ७० हजार रुपये मागितले आहेत. असे सांगितले. परंतु तक्रारदाराला संशय आल्यानंतर त्यांनी याबाबतची तक्रार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.

तक्रार दाखल झाल्यानंतर सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक २६ एप्रिलला याबाबत पडताळणी केली. या प्रकरणामध्ये संबंधित वकिलाने पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार लाचेची रक्कम बुधवार दिनांक १५ मे'ला घेण्याचे ठरले होते. त्यानुसार सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सकाळपासूनच सातारा येथील ग्राहक न्यायालय परिसरात सापळा लावला. यावेळी ग्राहक न्यायालयाच्या बाहेर रक्कम स्वीकारताना अॅड. शिवराज पाटील यांना सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचासमक्ष रंगेहात पकडले आहे.

याप्रकरणी संशयित वकिलावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपाधिक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक अरिफा मुल्ला यांनी सहभाग घेतला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details