सातारा -कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम व सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे झालेल्या प्रचार सभेत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या पक्षातील जाहीरनाम्यातील अनेक योजनांचा उच्चार केला. तसेच राज्यात पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा... आमच्यावर टीका न करता 'त्यांनी' विकासाच्या नावावर मतदान मागावे - खासदार चिखलीकर
महात्मा गांधी मैदानावर जमलेल्या जनतेला संबोधित करताना ठाकरे म्हणाले, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. या कार्यासाठी लोकांचे आशीर्वाद घायचे असतात, असे त्यांनी सांगितले होते. जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण रहिमतपूर येथे आलो आहोत. महायुतीच्या उमेदवारांना मिळणारे मत म्हणजेच जनतेचे आशीर्वाद आपल्याला लाभणार आहेत. तसेच आपण येथे केवळ मत मागायला नव्हे तर नवमहाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन आलो आहोत, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
हेही वाचा... विकासकामे करून दाखवावी लागतात ती फेकाफेकी करून होत नसतात; जयदत्त क्षीरसागरांचा विरोधकांना टोला
महाराष्ट्र उपाशीपोटी राहायला नाही पाहिजे. त्यासाठी राज्यात ठिकठिकाणी अवघ्या दहा रुपयांमध्ये जेवण देता येतील, अशी 1000 भोजनालये सुरू कराण्याची आमची योजना आहे. यामुळे भुकेलेल्याला अन्न मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. युवकांसाठी एक वर्षाची फेलोशिप, उद्योगधंद्यांमध्ये भूमिपुत्रांना 80 टक्के आरक्षण, ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा करिता अडीच हजार बससेवा सुरू करणार आहोत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नव्हे तर शंभर टक्के कर्जमुक्त करण्याचे अभिवचन आपण देतो आहोत, असे ठाकरे यावेळी म्हणाले.