कराड नगरपालिकेच्या तिजोरीत 3 कोटींची भर; 5 मिळकती सील, 107 नळ कनेक्शन तोडले - satara
नगरपालिकेने दि. 22 फेब्रुवारीपासून वसुली मोहीम सुरू केली आहे. वीस दिवसांत विक्रमी कर वसुली नगरपालिकेने केली आहे. थकीत करापोटी नळ कनेक्शन तोडण्यासह मिळकतींवर जप्तीचीही कारवाई कारण्यात आली आहे.
कराड :कराड नगरपालिकेने कर वसुलीची मोहीम तीव्र केली आहे. यामुळे केवळ वीस दिवसांत 3 कोटी 1 लाख 25 हजार रूपये कर वसूल झाला आहे. तसेच थकीत करापोटी 5 मिळकती सील केल्या असून 107 नळ कनेक्शनही तोडले आहेत.
नगरपालिकेने दि. 22 फेब्रुवारीपासून वसुली मोहीम सुरू केली आहे. वीस दिवसांत विक्रमी कर वसुली नगरपालिकेने केली आहे. थकीत करापोटी नळ कनेक्शन तोडण्यासह मिळकतींवर जप्तीचीही कारवाई कारण्यात आली आहे. थकीत कराची रक्कम भरून जप्ती आणि नळ कनेक्शन तोडण्यासारखे कटू प्रसंग टाळावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, सोमवारी रविवार पेठेतील एक कापड दुकान, सह्याद्री पतसंस्थेच्या विविध ठिकाणच्या तीन मिळकती आणि शनिवार पेठेतील एक मोबाईल टॉवर अशा एकूण पाच ठिकाणच्या मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आली. त्यामधील काही दुकानदारांनी थकित करापोटी 80 हजार रूपयांची रक्कमही भरली. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुली प्रमुख उमेश महादर, लिपिक जयवंत यादव, सुरेश जाधव, अय्याज आत्तार, जितेंद्र मुळे, फिरोज मुजावर, सादिक मुल्ला, पांडुरंग सपकाळ, राजेंद्र ढेरे, सुनिल बसरगी, इखलास शेख, फैय्याज शेख यांचे पथक थकीत कराची वसुली आणि जप्तीची कारवाई करत आहे.