सातारा - जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने पूर्वीपेक्षा कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज वाहन चालकांवर कारवाईचा बडगा पोलिसांनी उचलला. या विशेष मोहिमेत सातारा पोलिसांनी एकाच दिवसात २ हजार ५८८ वाहनचालकांकडून ५ लाख ८८ हजार २५० रुपये दंड वसूल केला.
सातारा पोलिसांची विशेष मोहिम: अडीच हजार वाहनचालकांवर कारवाई; ६ लाखांचा दंड जमा - Satara Police action against vehicles
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने विविध नियम लावले आहेत. मात्र, नागरिक त्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले. त्यामुळे सातारा पोलिसांनी नागरिकांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या विशेष मोहिमेत सातारा पोलिसांनी एकाच दिवसात २ हजार ५८८ वाहनचालकांकडून ५ लाख ८८ हजार २५० रुपये दंड वसूल केला.
सातारा पोलीस दलामार्फत संपूर्ण जिल्ह्यात विशेष मोहिम राबवण्यात आली. यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने घातलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. मास्क न वापरणारे, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, दुचाकीवर डबल सीट व चारचाकीत चार जणांनी प्रवास करणे आदी प्रकरणी कारवाई करण्यात आली. या शिवाय वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार ८५६ वाहनधारकांकडून ४ लाख ४९ हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही माहिती दिली.
याशिवाय मास्कचा वापर न केल्याने शाहुपुरी पोलीस ठाण्यात एक, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न केल्याप्रकरणी भूईज व शाहुपुरी पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक, सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक अधिनियम अन्वये तीन तर चारचाकी वाहनातून तीनपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केल्या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात एक गुन्हा नोंदवण्यात आला.