महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यातील धुडगूसप्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेला मेढ्यात अटक - Gaja marane arrest in Satara district

खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे याची तळोजा कारागृहपासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी गजा मारणेच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत रोड शो केला होता.

Gaja Marane
गुंड गजा मारणे

By

Published : Mar 6, 2021, 10:42 PM IST

सातारा - तळोजा जेलमधून निर्दोष सुटलेला गजानन ऊर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय ४८, रा. शास्त्रीनगर) याला पुण्यातील महामार्गावर धुडगूस घातल्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांना गुंड गजा मारणे हवा होता. त्याला पोलिसांनी मेढ्यात जेरबंद केले.


खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणे याची तळोजा कारागृहपासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी गजा मारणेच्या समर्थकांनी शक्तिप्रदर्शन करत रोड शो केला होता. प्रसारमाध्यमांतून यावर टिकेची झोड उठली होती. आपल्याला अटक होणार हे लक्षात आल्यानंतर गजा मारणे पोलिसांना गुंगारा देत फरार झाला होता. गुंड मारणे हा थेट महाबळेश्वर व वाई परिसरात गेल्या काही दिवसांपासून फिरत असल्याची पोलिसांना माहिती होती. मोटारीतून मारणे हा मेढा येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळताच मेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी त्याला जेरबंद केले.

संबंधित बातमी वाचा-गुंड गजा मारणेचे आणखी सहा साथीदार गजाआड, चार महागड्या गाड्याही जप्त

अखेर सापडला कचाट्यात-

रोड शो प्रकरणी पुणे पोलिसांनी मारणेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा अटक करण्यासाठी यंत्रणा लावली होती. मात्र, तो पुणे पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर मेढा पोलिसांच्या कचाट्यात तो बरोबर सापडला.

संबंधित बातमी वाचा-तुरुंगातून बाहेर पडताच कुख्यात गुंड गजानन मारणेची चाहत्यांकडून जंगी मिरवणूक

नेमके काय घडले होते?

पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरून पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 वाहने होते. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडाओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.

संबंधित बातमी वाचा-गजानन मारणे याच्यावर खंडणीची गुन्हा दाखल; मोक्का अंतर्गत कारवाई लकवरच?

कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह साथीदारांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी खंडणी गुन्हा दाखल केला आहे. फूड मॉल येथून वडापाव, सँडविच यासारख्या खाद्यपदार्थासह पाण्याच्या बॉटल्स मारहाण करून घेऊन गेल्या प्रकरणी दरोडाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नुकतेच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

पोलिसांची डोकेदुखी वाढली-

काही वर्षांपूर्वी पुण्यात घायवळ आणि मारणे या दोन टोळ्यांची दहशत होती. गुंडांच्या या टोळीने एकमेकांच्या टोळीवर जीवघेणे हल्ले केले होते. या टोळीची वाढती दहशत पाहून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत कारागृहात डांबले होते. परंतु आता पुन्हा या दोन्ही डोळ्यातील बहुतांश सदस्य आणि त्याचे प्रमुख तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यातच गजानन मारणेचे चाहत्यांनी ज्या प्रकारे स्वागत केले, ते पाहून पोलिसांसमोरची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details