सातारा- दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आणि न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयीताने पोलिसांना हातावर तुरी देत पलायन केल्याने खळबळ उडाली. कराड शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात शनिवारी (दि.21 डिसें) सायंकाळी ही घटना घडली. विकास वसंत गुंड उर्फ निकम, असे पळून गेलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.
विकास वसंत गुंड उ़र्फ निकम हा दरोड्याच्या गुन्ह्यात अटक केलेला संशयीत होता. त्याच्यासह विविध गुन्ह्यातील 14 संशयीतांना कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यासाठी सातारा सब जेलमधून कराडला आणण्यात आले होते. त्यांना शनिवारी दुपारी 2 वाजता कराडच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना घेऊन पोलीस पुन्हा साताऱ्याला निघाले होते. त्यावेळी संशयीत आरोपींपैकी सुनील मारूती उबाळे यास शौचास जायचे असल्याने सर्व संशयीतांना घेऊन निघालेली पोलीस व्हॅन कराड शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर आली. पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस व्हॅन उभी करून पोलिसांनी सुनील उबाळे यास शौचालयात नेण्यासाठी त्याच्या सोबत असलेल्या विकास निकम याची बेडी काढली. दोन पोलीस कर्मचार्यांनी सुनील उबाळे यास व्हॅनमधून बाहेर काढण्यासाठी दरवाजा उघडला. ती संधी साधून दरोड्याच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी विकास निकम पळून गेला. संशयीत आरोपींना कोर्टात घेऊन आलेल्या पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, कोल्हापूर नाक्यावरील गर्दीचा फायदा घेऊन तो पसार झाला.