सातारा - २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी पुण्यातील व्यापारी चंदन कृपालदास शेवाणी (४८) यांची हत्या झाली होती. या गुन्ह्याची उकल करून संशयितास अटक करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. पाडेगाव (ता. खंडाळा जि. सातारा) येथे चंदन शेवाणी यांचा मृतदेह रविवारी आढळला होता. शेवाणी यांना पाडेगाव येथील कॅनॉलवर आणून धारधार शस्त्राने वार आणि गोळ्या मारुन त्यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे व्यापारी हत्या प्रकरण : साताऱ्यातील आरोपीला अटक
सातारा येथे २ कोटी खंडणीसाठी पुण्यातील व्यापारी चंदन कृपालदास शेवाणी यांची हत्या झाली होती. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डॉ. सागर वाघ आणि आनंदसिंग साबळे हे तपास करत होते. यावेळी पोलिसांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की या गुन्ह्यातील संशयित लोणंद येथे येणार आहे. त्याप्रमाणे पोलीस पथक संशयितास ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले. लोणंद (ता. खंडाळा) येथील शास्त्री चौक, मोमीन बिल्डींग परिसरात सापळा लावण्यात आला. रात्री 10 च्या सुमारास एक व्यक्ती संशयितरित्या मोमीन बिल्डींग समोर फिरत असताना आढळून आला. त्याला पोलिसांनी शिताफिने ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अधिक चौकशीत त्याने चंदन शेवाणी यांचे साथदारांच्या मदतीने अपहरण करुन खून केल्याची कबुली दिली. आफ्रिदी रौफ शेख (वय 23 रा. नाना पेठ, पुणे) असे संशयिताचे नाव आहे. या गुन्ह्यात त्याचे 3 ते 4 साथिदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
चंदन शेवाणी यांचे अपहरण करुन पाडेगाव येथील कॅनॉलवर आणून धारधार शस्त्राने वार करुन गोळ्या मारुन खून केला असल्याची कबूल केले. या संशयिताला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सहाय्यक निरीक्षक डॉ.सागर वाघ, आनंदसिंग साबळे. सहाय्यक फौजदार विलास नागे, पृथ्वीराज घोरपडे, संतोष जाधव, प्रविण कडव, योगेश पोळ, पंकज बेसके, गणेश कापरे, धिरज महाडीक, केतन शिंदे, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसिन मोमीण, अनिकेत जाधव यांनी ही कारवाई यशस्वी केली.